उरुळी कांचन येथे रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू….

उरुळी कांचन: पुणे-दौंड लोहमार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नऊ मोरी परिसरात अज्ञात रेल्वे गाडीने दिलेल्या धडकेत उरुळी कांचन येथील महिलेचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी (ता. 24) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिराबाई प्रतापराव फडतरे (वय -75, रा. महादेवनगर, उरुळी कांचन, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिराबाई फडतरे या मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांना काही सुचत नव्हते. त्यामुळे घरातून बाहेर गेल्यानंतर माघारी येता येत नव्हते. त्यामुळे त्यांना शोधून घरी आणावे लागत होते.

नेहमीप्रमाणे फडतरे या घरातून बाहेर गेल्या मात्र घरी परत आल्या नाहीत. त्यांची शोधाशोधा केली असता मिळून आल्या नाहीत. यावेळी उरुळी कांचन रेल्वे स्थानक येथील नऊ मोरी परिसरात एका अज्ञात रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता हिराबाई फडतरे असल्याचे निदर्शनास आले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, सदर घटनेची नोंद रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी करून पुढील कार्यवाही केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
