राज्यात पुन्हा धो-धो पाऊस की पावसाला ब्रेक? पुढील 4 आठवड्यांत कुठे किती बरसणार? जाणून घ्या हवामान विभागाचा मोठा अंदाज

पुणे : यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. देशातील काही भागांत मान्सून सक्रिय असला तरी अनेक भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचेच लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. अशातच हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज जाहीर केला आहे.
ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला. मात्र, उर्वरित दोन आठवड्यांत कोकण आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

14 ते 20 ऑगस्ट: या काळात मध्य भारत, ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश आणि कोकण-गोवा भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण भारत, ईशान्य भारतातील बहुतांश भाग आणि पूर्व राजस्थानात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे.


20 ते 27 ऑगस्ट: मध्य भारतातील बहुतांश भाग, पश्चिम बंगाल, ओडिशा, कोकण-गोवा, किनारपट्टी कर्नाटक आणि गुजरातच्या काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो.
27 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर: या काळात पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. महाराष्ट्रातही पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे.
3 ते 10 सप्टेंबर: केरळ, कर्नाटक, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील बहुतांश भाग आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पश्चिम घाट आणि कोकणातील हवामानाचा अंदाज अधिक जलद आणि अचूकपणे मिळणार आहे. महाबळेश्वर येथील एक्स-बँड डॉप्लर वेदर रडारची माहिती आणि ताजे हवामान अपडेट्स भारतीय हवामान विभागाच्या वेबसाइटवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी हवामानाशी संबंधित अचूक आणि ताज्या माहितीसाठी अधिकृत अंदाज पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.