“शाळेची घंटा १५ जूनला नाही वाजणार?” विदर्भातील उष्णतेने सरकार अलर्ट मोडवर; मोठ्या निर्णयाची शक्यता

मुंबई : विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असून उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे जनजीवन हैराण झाले आहे. रस्ते ओस पडू लागले आहेत, दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे आणि आता या प्रचंड उकाड्याचा फटका थेट शालेय विद्यार्थ्यांनाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार शाळा सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

नेहमीप्रमाणे १५ जूनपासून शाळा सुरू करण्याऐवजी, विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहिली तर शाळा थेट २६ जूनपासून सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले आहे. याबाबत शालेय शिक्षण विभाग लवकरच महत्त्वाची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
सध्या विदर्भातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे तब्बल ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे शहर देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. हवामान विभागाने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर नागपूर आणि यवतमाळसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत विनाकारण बाहेर न पडण्याचा इशाराही दिला आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री पंकज भोयर म्हणाले की, “१० जूननंतरही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहिली, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांची सुरक्षितता सरकारसाठी सर्वात महत्त्वाची आहे.”

दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
यासोबतच राज्य सरकार प्री-प्रायमरी शाळांसाठी स्वतंत्र नोंदणी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. ‘प्री-प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन अॅक्ट’चा मसुदा विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला असून आगामी अधिवेशनात तो सादर होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील वाढत्या तापमानामुळे आता पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचे लक्ष सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.