शेतजमिनीच्या वादातून माजी सरपंच गौरी गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा आरोप; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड यांच्यावर शेतजमिनीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

गौरी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगल झगडे, सविता झगडे, योगेश झगडे, हर्षल झगडे आणि दादासो झगडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजता गौरी गायकवाड या कवडी येथील गट क्रमांक ४१८ मधील त्यांच्या शेतात गेल्या होत्या. कामगारांना चहा दिल्यानंतर त्या शेतात बसल्या असताना योगेश झगडे, हर्षल झगडे आणि दादासो झगडे हे वारंवार शेत परिसरात फिरताना दिसले.

सकाळी सुमारे ९.२० वाजता सविता झगडे आणि मंगल झगडे या गाई घेऊन त्यांच्या शेतातून जात असल्याचे गायकवाड यांच्या निदर्शनास आले. “शेतातून गाई का नेत आहात?” असा जाब विचारल्यानंतर “ही शेती आमचीच आहे,” असे उत्तर देत वाद घातल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यानंतर गाईला शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना गौरी गायकवाड यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. त्याचवेळी मंगल झगडे यांनी गाईचा दावे त्यांच्या गळ्याभोवती गुंडाळून ओढल्याचा आरोप आहे. गळ्यातील दावे सोडविण्याचा प्रयत्न करत असताना तो त्यांच्या डाव्या हातात अडकला आणि गाय त्यांना फरफटत ओढत घेऊन गेल्याने त्यांच्या हात, पाय आणि कमरेला गंभीर दुखापत झाली.

आरडाओरडा ऐकून शेजारच्या शेतात काम करणारे त्यांचे पुतणे नील गायकवाड घटनास्थळी धावून आले. त्यांनी दावे सोडवून गौरी गायकवाड यांची सुटका केली. त्यानंतर ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.

त्यानंतर गौरी गायकवाड यांना विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांसमोर सविस्तर जबाब नोंदविल्यानंतर त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!