पुण्यात ‘गेमचेंजर’ ट्विस्ट! परभणीच्या राजकारणाचा परिणाम; भाजपच्या पदरात पडणार का विधान परिषदेची जागा?


पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना महायुतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. परभणीच्या जागेवरून सुरू झालेला वाद आता थेट पुण्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करू लागला असून, शेवटच्या क्षणी पुण्याची प्रतिष्ठेची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीतील पडद्यामागील हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांची धडधड वाढली आहे.

राज्यातील 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असला तरी नेमकी कोणती जागा कोणत्या पक्षाकडे जाणार, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये सस्पेन्स कायम आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच पुणे, रायगड आणि परभणी या तीन जागांवर दावा केला होता. यापैकी रायगडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र परभणीच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेना ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर महायुतीत नवे समीकरण पुढे येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परभणीची जागा राष्ट्रवादीला देऊन त्याबदल्यात शिवसेनेला साताऱ्याची जागा दिली जाऊ शकते. असे झाल्यास पुण्याची जागा भाजपच्या वाट्याला जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत भाजपची ताकद लक्षणीय वाढली असल्याने पक्षातील नेत्यांनीही या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने उमेदवारीच्या तयारीला वेग दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नावांची चर्चा सुरू असून दोघेही निवडणुकीसाठी तयारीत असल्याचे समजते.

महायुतीमध्ये मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर होणार नसल्याचे चित्र आहे. जागा भाजपला मिळाल्यास अनेक दिग्गज इच्छुकांच्या नावांवर चर्चा होऊ शकते. तर जागा राष्ट्रवादीकडे राहिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून एखादे अनपेक्षित नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता फारसा वेळ शिल्लक नसताना महायुतीतील या राजकीय घडामोडींनी पुण्याच्या निवडणुकीत रंगत आणली आहे. परभणीचा तिढा नेमका कसा सुटतो आणि त्याचा फायदा भाजपला होतो की राष्ट्रवादी बाजी मारते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!