महाराष्ट्रात पावसाने पुन्हा ओढ दिली! गुरुवारीही हलक्या सरींचा अंदाज; ६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट


मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असले, तरी अनेक भागांत अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडत असून उकाडाही वाढला आहे. अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.

भारतीय हवामान विभागाने  १६ जुलै रोजी राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या दिवशी काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबई येथे वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथेही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तसेच सातारा घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे घाटमाथा, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरातही पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली येथे हलक्या सरी पडू शकतात. बीड, नांदेड आणि लातूर येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर धाराशिव जिल्ह्यासाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

एकूणच, १६ जुलै रोजी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, सध्या तरी मुसळधार पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे विशेषतः विदर्भ आणि काही अंतर्गत भागांतील शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!