मोठी बातमी! दिवंगत अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, शासनादेश जारी

मुंबई : राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ च्या अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे. त्यामुळे २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी करण्यात येणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार, मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये २२ जुलै रोजी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि विविध शासकीय संस्थांमध्येही त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने तातडीने परिपत्रक जारी करत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

शासनाच्या परिपत्रकानुसार, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणांमध्ये जयंती कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने या निर्णयामागे स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनात केलेले कार्य, प्रशासनातील योगदान आणि विकासकामांतील भूमिका यांचा गौरव असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी त्यांची जयंती अधिकृत शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे.