लग्नाच्या पंगतीसाठी आता परवानगी घ्यावी लागणार? केटरर्सला 7 दिवस आधी द्यावी लागणार माहिती; तुकाराम मुंढेंचा नवा नियम काय?

मुंबई : कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे.
पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा, लंगर, इफ्तार पार्टी, महाप्रसाद तसेच लग्नसमारंभातील जेवणासाठी आयोजकांना कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. लग्नाच्या जेवणासाठी ही परवानगी संबंधित केटरर्सना घ्यावी लागणार आहे.

केटरर्ससाठी नवी नियमावली
लग्नाच्या जेवणासाठीच्या परवानगीमध्ये वधू-वर किंवा त्यांच्या पालकांचा समावेश असणार नाही. ही प्रक्रिया केवळ जेवण बनवणाऱ्या केटरर्ससाठी लागू असेल. संबंधित केटरर्सला जेवणासाठी लागणारा कच्चा माल कुठून खरेदी केला, याची माहिती प्रशासनाला द्यावी लागणार आहे.


दूध, खवा, पनीर, तूप, मिठाई, सुकामेवा, बर्फ, पाणी आणि खाद्यरंग यांसारख्या पदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई तसेच गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
दरम्यान, कोणत्याही कार्यक्रमावर बंधन आणणे हा या नियमांचा उद्देश नसून नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा मुख्य हेतू असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
सण-उत्सवांसाठी विशेष अन्न सुरक्षा ॲक्शन प्लॅन
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने सण-उत्सवांच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी विशेष यंत्रणा तयार केली आहे. ईद, होळी, बकरी ईदपासून गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळीपर्यंत वर्षभर साजऱ्या होणाऱ्या विविध सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची तपासणी आणि नियमांचे पालन सुनिश्चित केले जाणार आहे.
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, सण कोणताही असो, नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी अन्न मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ‘सेफ फूड अँड सेफ ड्रग’ ही संकल्पना राबवली जात असून, सणांच्या काळात अन्नपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ३ सप्टेंबरपासून वर्षभरातील सण-उत्सवांसाठी विशेष अन्न सुरक्षा ॲक्शन प्लॅन लागू करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, कोणत्याही एका धर्माच्या सणासाठी स्वतंत्र नियम असणार नाहीत. सर्व धर्मीय समुदायांचे सण आणि कार्यक्रम एकाच अन्न सुरक्षा कायद्याच्या चौकटीत समान पद्धतीने तपासले जाणार आहेत.