जरांगेंच्या आंदोलनावर आज तोडगा निघणार? संभाजीनगरात महत्त्वाची बैठक; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला ११ दिवस पूर्ण झाले आहेत. अन्न-पाणी त्यागल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असून उपचार सुरू करण्यात आले असले तरी प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे, जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून राज्यातील विविध भागांत आंदोलनं तीव्र होत आहेत.
रास्ता रोको, बंद आणि विविध प्रकारची आंदोलनं सुरू झाल्याने सरकारवरील दबाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे शिष्टमंडळ, माजी न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मराठा आरक्षणाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. हैदराबाद गॅझेटनुसार उपलब्ध झालेल्या कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.


जरांगे उपोषण मागे घेणार?
आजच्या बैठकीसाठी सरकारकडून कोणते नेते किंवा अधिकारी उपस्थित राहणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला होता.
त्यामुळे हे दोन्ही नेते आजच्या बैठकीत सहभागी होणार का, याकडे लक्ष लागले आहे. बैठकीत सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सरकारच्या निर्णयामुळे जरांगे उपोषण मागे घेणार का, हा प्रश्नही चर्चेत आहे.
नांदेडमध्ये रास्ता रोको
दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नांदेड-नागपूर महामार्गावरील हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे आंदोलकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक रोखली.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सोलापुरात अनोखे आंदोलन
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सोलापुरातही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सोलापूर विद्यापीठासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून काही युवकांनी आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जरांगे यांच्या आंदोलनाची सरकारने तातडीने दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी आंदोलकांची मागणी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील आंदोलनांची तीव्रता वाढताना दिसत आहे.