लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० रुपये जमा होणार? केंद्राच्या अहवालाने वाढल्या अपेक्षा; सरकार काय निर्णय घेणार?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घडामोड समोर आली आहे. सध्या या योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपये मिळत असले तरी ही रक्कम वाढवण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या (EAC-PM) अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे. महागाई, वाढता घरगुती खर्च आणि महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन अशा योजनांतील आर्थिक मदतीचा वेळोवेळी फेरआढावा घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये मिळण्याची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे.

अहवालात महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ओडिशातील ‘सुभद्रा’ योजनेचा अभ्यास करण्यात आला आहे. या योजनांमुळे महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चाला हातभार लागला आणि कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यातील सरासरी शिल्लक ८४ टक्क्यांनी वाढल्याचा, तर आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांवरील खर्चात ४६ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
महिलांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयं-सहायता गटांशी जोडण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने अद्याप २,१०० रुपये देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दुसरीकडे, ई-केवायसी अपूर्ण राहणे, निकषांची पूर्तता न होणे आणि अर्जातील त्रुटींमुळे सुमारे ८० लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यामुळे आता केंद्राच्या शिफारसीनंतर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.
