प्रेमसंबंध, कौटुंबिक कलह आणि थरारक कट; सांगलीत पत्नीने प्रियकरासोबत पतीचा घेतला जीव


सांगली : पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातून एक धक्कादायक खून प्रकरण समोर आले आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पतीचा झोपेत नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

मृत व्यक्तीचे नाव आनंद हणमंत सर्जे (वय २८, रा. पोळमळा, सांगली) असे आहे. आनंद हा शहरातील एका नामांकित कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. पत्नी आणि दोन लहान मुलांसह तो राहत होता. गुरुवारी पहाटे अचानक प्रकृती बिघडल्याचे सांगत त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच झाल्याचे स्पष्ट केले.

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करताना गळ्यावर ओरखडे आणि संशयास्पद खुणा आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सुरुवातीला पत्नीने आनंदला काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती आणि त्यानंतर झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला. मात्र, चौकशीदरम्यान तिच्या जबाबात वारंवार विसंगती आढळल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

मृतदेहाचे मिरजेतील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अहवालातून मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या २३ वर्षीय प्रियकराला ताब्यात घेतले. कसून चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली.

प्राथमिक तपासानुसार, आनंद दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असल्याचा आणि सतत मानसिक त्रास देत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने प्रियकराला घरी बोलावले. दोघांनी मिळून आनंदचे पाय ओढणीने बांधले आणि त्याच्या छातीवर बसून गळा आवळत त्याचा खून केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दोन लहान मुलांचे भविष्य अंधारात टाकणाऱ्या या घटनेमुळे सांगली शहरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!