मराठवाड्यात महापूर का आला? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले…

मुंबई : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाला आहे. धाराशिव, जालना, लातूर, बीड आणि परभणी अशा जवळपास सर्व जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

घरं कोसळली, शेतं जलमय झाली आणि कष्टाने पेरलेली पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या अशा-अपेक्षांवर पाणी फिरलं आहे. गावोगावी नुकसानीचे पंचनामे चालू झाले असून प्रशासन यामध्ये पूर्ण ताकतीने काम करत आहे.
या महाप्रलयाची तीव्रता इतकी आहे की मराठवाड्याच्या प्रत्येक कुटुंबाला याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिथे नजर जाईल तिथे फक्त पाणी आणि नाराज झालेले नागरिक अशी वाईट परिस्थिती आहे.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे.

या पूरपरिस्थितीचं मुख्य कारण हवामान बदल असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही वर्षांत मराठवाड्याला दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान बदलाचा परिणाम या ठिकाणी अधिक तीव्रतेने जाणवत असून याचा शेतीवर सर्वाधिक फटका बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विस्कळीत झाली आहे.
मराठवाड्यात २१ सप्टेंबरपर्यंत तब्बल २३ लाख ४१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यावरून ही परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. हवामान बदलाच्या परिणामांना आळा घालण्यासाठी जागतिक बँकेने दिलेले सहा कोटी रुपये शेतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती ही फडणवीस यांनी दिली. हवामान बदलाचा परिणाम सहन करू शकेल अशी शेती करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.