शरद पवार यांच्या निष्ठावंताला बसणार धक्का, अजित पवार कोणाला प्रवेश देणार..!!

सांगली : सांगलीतील शरद पवार यांचे विश्वासू जयंत पाटील यांना हादरा बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सांगलीतील जयंत पाटील यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे. अजित पवार आपला गट अधिक मजबूत करत आहेत. आता अजित पवार पुन्हा शरद पवार यांना देणार धक्का अशी चर्चांना उधाण आले आहे.

तसेच जयंत पाटील गटाचे हे माजी नगरसेवक लवकरच अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा देखील होत असून लवकरच सांगलीत अजित पवारांच्या हस्ते प्रवेश कार्यक्रम घेण्याचे नियोजन अजित पवार गटाकडून होतं आहे. भेटीला गेलेल्या माजी नगरसेवकाकडून मात्र शहराच्या विकासासाठी निधीबाबत चर्चा करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलो असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मुंबईत अजित पवार यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांचे विश्वासू सहकारी राहिले आहे. बंडानंतर त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. आता अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या जवळच्या असलेल्या काही माजी नगरसेवकांना आपल्या गटात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत बुधवारी सायंकाळी भेट घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच जयंत पाटील गटाचे हे माजी नगरसेवक अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
