वंदे भारत, शताब्दी, राजधानी या प्रीमियम रेल्वे गाड्यांचे मालक कोण आहेत? खरी माहिती आली समोर..

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे सध्या हायस्पीड ट्रेनच्या दिशेने वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. तसेच यामुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. वंदे भारत, शताब्दी एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेससारख्या सुपरफास्ट गाड्या भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आहेत.
पण या प्रीमियम ट्रेनांचे खरे मालक कोण आहेत? दुसरीकडे, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळण्याची चर्चा जोरात आहे, ज्यामुळे या प्रश्नाचे उत्तर अधिक स्पष्ट होत आहे.
तसेच आयआरएफसीला नुकतेच सरकारने नवरत्नाचा दर्जा बहाल केला आहे. या निर्णयानंतर कंपनीचे सीईओ आणि सीएमडी मनोज कुमार दुबे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, नवरत्न दर्जामुळे कंपनीला आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचे विशेष अधिकार मिळाले आहेत.
दरम्यान, यामुळे कंपनी आता जलद गतीने निर्णय घेऊ शकणार आहे. दुबे यांनी पुढे नमूद केले की, या दर्जामुळे रेल्वे क्षेत्रातील कर्जपुरवठा व्यवसायाला अधिक वेग येणार आहे. आयआरएफसी आता रेल्वेच्या गरजांसाठी अधिक प्रभावीपणे निधी उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे.
मनोज कुमार दुबे यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला की, भारतीय रेल्वेत वापरली जाणारी सर्व इंजिने, मालगाड्यांचे डबे आणि प्रवासी डबे हे आयआरएफसीच्या मालकीचे आहेत.
या गाड्या भारतीय रेल्वेला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिल्या जातात. या गाड्यांसाठी लागणारा निधी आयआरएफसी बाजारातून उभारते आणि रेल्वेला उपलब्ध करून देते. भाडेपट्ट्याच्या नियमांनुसार, या गाड्या ३० वर्षांपर्यंत आयआरएफसीच्या नावावर राहतात.
दरम्यान, याचा अर्थ असा की, वंदे भारत, शताब्दी आणि राजधानीसारख्या प्रीमियम गाड्या तांत्रिकदृष्ट्या आयआरएफसीच्या मालमत्तेचा भाग आहेत. भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांपैकी सुमारे 80 टक्के गाड्या आयआरएफसीच्या मालकीच्या आहेत.