साखर कुठे गायब झाली? दरवाढीवर राजू शेट्टींचा संताप; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप


बारामती : देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात अवघ्या काही दिवसांत मोठी वाढ झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही दर अचानक वाढण्यामागचे कारण काय, असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

22 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात शेट्टी यांनी साखरेच्या दरवाढीचा हिशेब मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट 2025 मध्ये साखरेचा दर सुमारे 3,700 रुपये प्रतिक्विंटल होता. यंदाच्या ऑगस्टमध्ये हा दर 6,700 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच वर्षभरात प्रतिक्विंटल सुमारे 3 हजार रुपयांची वाढ झाली असून, अलीकडेच किलोमागे सुमारे 20 रुपयांची अचानक वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

देशात साखरेचा पुरेसा साठा, तरी दरवाढ का?

शेट्टी यांनी देशातील साखरेच्या उत्पादन आणि उपलब्धतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. 2024-25 मध्ये सुमारे 260 लाख टन, तर 2025-26 मध्ये सुमारे 290 लाख टन साखरेचे उत्पादन झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याशिवाय मागील हंगामातील सुमारे 50 लाख टन प्रारंभिक साठा उपलब्ध होता.

देशातील वार्षिक साखर वापर सुमारे 280 लाख टन असल्याचे नमूद करत, उपलब्धता पुरेशी असताना साखरेचे दर एवढ्या वेगाने का वाढत आहेत, असा सवाल शेट्टी यांनी केला आहे. साखरेची साठेबाजी किंवा काळाबाजार होत आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय?

साखरेच्या अचानक झालेल्या दरवाढीमागे साठेबाजी आणि काळाबाजार असण्याची शक्यता व्यक्त करत शेट्टी यांनी या प्रकरणात सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे. मागील सहा महिन्यांतील साखर विक्री, साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

वाढत्या दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळतोय का?

साखरेच्या बाजारभावात मोठी वाढ होत असताना त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कितपत मिळतोय, हा प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार ऊस उत्पादकांना प्रतिटन सुमारे 5,500 रुपये मिळायला हवेत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच मागील वर्षी पुरवलेल्या उसासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त 1,000 रुपये प्रतिटन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कच्च्या साखरेच्या आयातीवरही नाराजी

देशात साखरेचा पुरेसा साठा असताना कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी देण्याच्या केंद्राच्या निर्णयावरही शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयात केलेली साखर बाजारात आल्यानंतर पुढील हंगामात दर कमी होऊन त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

साखरेच्या दरवाढीची तातडीने चौकशी करून दर स्थिर करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, मागील सहा महिन्यांतील साठा, विक्री आणि आर्थिक व्यवहार तपासावेत तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!