नितीन गडकरींचं मोठं विधान; ‘आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे’

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत झालेल्या बदलाबाबत भाष्य करताना महत्त्वाचे विधान केले आहे. “आता मी जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला संधी दिली पाहिजे,” असे गडकरी यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
नागपुरातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना आत्मविकास आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देताना त्यांनी आपल्या जुन्या जीवनशैलीचाही किस्सा सांगितला.

‘कोरोनानंतर शिस्तबद्ध जीवनशैली’
गडकरी यांनी सांगितले की, पूर्वी पक्षाचे काम करताना त्यांची जीवनशैली काहीशी अनियमित होती. कामाच्या धावपळीत समोसा खाऊन झोपण्याचे दिवसही होते. मात्र, कोरोनानंतर त्यांनी आरोग्याकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. आता नियमित व्यायाम आणि प्राणायाम करत असल्याचे त्यांनी सांगितले.


आरोग्य चांगले असेल तरच सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञानाचा उपयोग होतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला.
‘नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे’
आपल्या राजकीय आणि सामाजिक कामाबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, पूर्वी जितके काम करता आले तितके केले. आता कामातील आपला सहभाग कमी झाला असून, नवीन पिढीच्या हाती जबाबदारी देणे गरजेचे आहे. नवीन लोक पुढे आले असून, जुने कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
‘लूना’पासून पक्षाच्या कामाच्या आठवणी
गडकरी यांनी आपल्या सुरुवातीच्या राजकीय काळातील काही आठवणीही सांगितल्या. त्या काळात त्यांच्याकडे लूना होती. त्यानंतर स्कूटरवरून पक्षाचे काम करण्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. पक्षाच्या नेत्यांना विमानतळावरून आणण्यासाठी एका कार्यकर्त्याकडे अॅम्बेसिडर कार असल्याने त्याला पक्षाध्यक्ष बनवल्याचा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.
‘एकाही आदिवासी गावात अंधार राहणार नाही’
कार्यक्रमात संस्थेच्या कामाचे कौतुक करताना गडकरी यांनी राज्यातील प्रत्येक आदिवासी गावात विकासाचा उजेड पोहोचवण्याचे आवाहन केले. स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास करतानाच समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी वेळ द्यावा, असेही त्यांनी सांगितले.