लाडक्या बहिणीचे पैसे कुठं गेले? विचारताच बायकोवर नवरा अन् सासूचा कोयत्याने हल्ला, घटनेने उडाली खळबळ…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
तसेच या योजनेतील मिळणाऱ्या पैशांवरून अनेक वाद झाल्याचं समोर आलं होतं. तसेच कुटुंबात कलह देखील वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशातच आता मिळालेले पैसे परस्पर खर्च केल्याने जाब विचारणाऱ्या महिलेला पती आणि सासूने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
माढा तालुक्यातील लोणी येथे राहणाऱ्या निशा लोंढे असं मारहाण झालेल्या विवाहितेचं नाव असून, पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत.
सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे मिळाले होते. मात्र, त्यांचा पती धनाजी लोंढे याने हे पैसे परस्पर काढले. पत्नीने हे पैसे काढल्याबद्दल विचारणा केली असता, नवरा आणि सासूने वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर थेट कोयत्याने हल्ला केला.
पत्नी“माझे पैसे तुम्ही का काढले?, असा जाब विचारताच, नवऱ्याने वाद घालण्यास सुरुवात केली. सासू रूपाबाई लोंढेही या वादात सहभागी झाली आणि दोघांनी मिळून निशाला बेदम मारहाण केली. हल्ल्यात निशा गंभीर जखमी झाली असून तिच्या पाय, गुडघा आणि हातावर कोयत्याने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.