सुनेचं सासऱ्यासोबत अफेअर? WhatsApp चॅट पाहताच मुलाचा संताप अनावर; पत्नी-वडिलांची गोळ्या झाडून हत्या

बुलंदशहर : एका WhatsApp चॅटने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं… पत्नी आणि स्वतःच्या वडिलांमध्ये सुरू असलेल्या कथित संबंधांचा संशय, नवजात बाळावरून निर्माण झालेला वाद आणि घरात रोज होणारे भांडण… अखेर या सगळ्याचा शेवट दुहेरी हत्याकांडात झाला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका तरुणाने संतापाच्या भरात स्वतःच्या पत्नी आणि वडिलांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

खुर्जा भागातील कलंदरगढी गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. आरोपी मोमीन याने पत्नी सना आणि वडील रियाजुद्दीन यांच्यावर गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे सना आणि सासरे रियाजुद्दीन यांच्यातील कथित जवळीक हे मुख्य कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मोमीन आणि सना यांचा निकाह 14 फेब्रुवारी 2025 रोजी झाला होता. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. मात्र काही महिन्यांनंतर घरातील वातावरण बदलू लागलं. सना आणि रियाजुद्दीन यांच्यातील वाढती जवळीक पाहून घरात वाद सुरू झाले. मोमीनची आई किस्वर यांनीही या नात्यावर संशय व्यक्त करत मुलाला सावध केल्याची माहिती समोर आली आहे.

तपासात समोर आल्यानुसार, मोमीनने पत्नीच्या WhatsApp अकाउंटचं वेब लॉगिन आपल्या लॅपटॉपशी जोडून ठेवलं होतं. त्यामुळे पत्नी आणि वडिलांमधील संभाषण, मेसेज आणि व्हॉईस नोट्स तो रोज पाहत आणि ऐकत होता. यामुळे त्याचा संशय अधिकच वाढत गेला. पोलिस आता या डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत.

दरम्यान, 10 मे रोजी सनाने एका मुलाला जन्म दिला. मात्र हे बाळ आपलं नसल्याचा संशय घेत मोमीनने त्याला स्वीकारण्यास नकार दिला. यावरून घरात मोठा वाद झाला. अनेकदा समेटाचे प्रयत्न झाले, पण परिस्थिती आणखी चिघळत गेली.
अखेर संतापाच्या भरात मोमीनने घरातच पिस्तूल काढत पत्नी आणि वडिलांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला नाही. त्याने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला हत्यारासह अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कौटुंबिक नात्यांमधील वाढता अविश्वास, डिजिटल हेरगिरी आणि संशयातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.