केतनला लोहगडावरून ढकलण्यापूर्वी, सिया-चेतनमध्ये काय घडलं? तपासातून समोर आली महत्त्वाची माहिती

पुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपत असून, दोघांना वडगाव दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलीस त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याला कड्यावरून ढकलण्यापूर्वी अवघ्या 34 मिनिटे आधी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात फोनवर दीर्घ संभाषण झाले होते. दोघांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) मधून ही माहिती समोर आली असून या कॉलमधून गुन्ह्याच्या अंतिम टप्प्याची आखणी झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त केले असून त्यातील कॉल रेकॉर्ड, चॅट्स, गुगल सर्च हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. डिलीट करण्यात आलेला डेटा पुन्हा मिळवण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सियाने फोनवरून चेतनला लोहगडावरील नेमके ठिकाण सांगितले असावे. तसेच परिसरात इतर पर्यटक किंवा साक्षीदार नसल्याची खात्री करून घेतल्यानंतर पुढील हालचाली करण्यात आल्या असाव्यात, असा तपास यंत्रणांचा संशय आहे. मात्र, या दाव्यांबाबत न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू असून अंतिम निष्कर्ष आलेला नाही.

तपासादरम्यान आणखी एक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, केतनच्या मृत्यूनंतर चेतन चौधरीने आपल्या मोबाईलमधील कॉल हिस्ट्री आणि चॅट्स डिलीट केल्याचा संशय आहे. हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी एकमेकांवर दोषारोप करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. सुरुवातीला दोघांनीही तपासात सहकार्य केल्याचे सांगितले जात असले, तरी आता दोघेही हत्येची जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात सिया गोयलने चौकशीदरम्यान केतन विग वापरत असल्यामुळे लग्नाबाबत नाराजी होती, असा दावा केल्याचे वृत्त आहे. मात्र, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी हा दावा फेटाळत, लग्न ठरण्यापूर्वीच गोयल कुटुंबाला याची माहिती दिली होती, तसेच ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह सियानेच धरल्याचा दावा केला आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून न्यायालयात सादर होणारे पुरावे आणि पुढील सुनावणीतील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.