चिकन खाल्ल्यानंतर काय घडलं? पत्नी गेली, 10 दिवसांनी पतीनेही गमावला जीव; प्रकरणात नवा ट्विस्ट


नाशिक : अन्नपदार्थांमधील भेसळीचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आखतवाडे गावातील एका शेतकरी दाम्पत्याने रात्री चिकनचे जेवण केल्यानंतर दही खाल्ले होते. त्यानंतर दोघांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला होता. आता उपचार घेत असलेल्या पतीचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी रात्री जेवणानंतर 68 वर्षीय द्वारकाबाई यांची प्रकृती खालावली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पती शांताराम यांच्यावर मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचाही मृत्यू झाला.

या घटनेमुळे आखतवाडे गावासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने गावात दाखल होऊन तपास सुरू केला आहे. नेमकी विषबाधा कोणत्या कारणामुळे झाली, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, चिकननंतर दही खाल्ल्यानेच विषबाधा झाली का, याबाबत तज्ज्ञांकडूनही तपास केला जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, चिकन आणि दही एकत्र खाल्ल्याने एवढी गंभीर विषबाधा होणे सामान्यतः अपेक्षित नसते. त्यामुळे अन्नपदार्थांमध्ये काही दूषित घटक होते का, याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणामुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. FDA कडून तपास पूर्ण झाल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!