पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? नामांकित शाळेत तीन वर्षांच्या चिमुरड्यासोबत संतापजनक प्रकार, शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल


पुणे : पुण्यातील घोरपडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेत तीन वर्षांच्या चिमुरड्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, मुलासोबत क्रूर वर्तन केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी शाळेतील शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मनिता असे शिक्षिकेचे, तर सोनाली असे व्यवस्थापिकेचे नाव आहे. घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रोडवर असलेल्या या शाळेत 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11.15 ते दुपारी 2.15 या वेळेत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चिमुरड्याच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली असून, शिक्षिकेने मुलाला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आईच्या तक्रारीनंतर 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.56 वाजता मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रणजित म्हस्के यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

म्हस्के यांनी सांगितले की, तीन वर्षांच्या मुलाला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याची तक्रार त्याच्या आईने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. सुरुवातीला शाळा प्रशासनाने फुटेज उपलब्ध करून देण्याचे सांगितले; मात्र नंतर ते मिळू शकले नसल्याचे कळवण्यात आले.

पोलिसांकडून शाळेचा डीव्हीआर जप्त

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी मंगळवारी शाळेचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केला आहे. तो न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या तपासणीत व्हिडिओमध्ये काही आढळल्यास गुन्ह्यात अतिरिक्त कलमे समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती तपास अधिकारी रणजित म्हस्के यांनी दिली.

शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 127(2), 3(5) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!