श्रद्धा अन् आस्थेचे स्थान!! भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्ष माळ घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली गंगा पूजा आणि अमृतस्नान..

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र कुंभमेळ्याची चर्चा सुरु आहे. प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी जगभरातील अनेक भाविकांनी हजेरी लावलीय. अनेक दिग्गजांनी आतापर्यंत या मेळ्यात शाही स्नानाचा आनंद घेतला. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतस्नान केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजला पोहोचले असून त्यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलं. प्रयागराजमधील संगममध्ये त्यांनी गंगा नदीची पूजा केली. मोदींच्या पवित्र स्नानाचे पहिले फोटो समोर आले आहेत.
भगवे वस्त्र, गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ घालून मोदींनी संगममध्ये स्नान केलं. काही मंत्रांचं पठण करत मोदींनी संगममध्ये पवित्र स्नान केलं. महाकुंभमधील या पवित्र स्नानाला अत्यंत महत्त्व आहे.
कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी वसंत पंचमी आणि मौनी अमावस्यासारखे शुभ दिवस निवडले जातात. परंतु मोदींनी आजचा 5 फेब्रुवारीचा दिवस का निवडला, असा प्रश्न अनेकांना पडला. तर यादिवशी माघ अष्टमी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार भक्ती, दानधर्म, तपश्चर्या यांमध्ये माघ अष्टमी शुभ दिवस मानला जातो.
दरम्यान, पंतप्रधान मोदी याआधी १३ डिसेंबर २०२४ प्रयागराज येथे उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी ५,५०० कोटी रुपयांच्य १६७ विकास योजनांचे उद्घाटन केले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्या दरम्यान त्यांना कडक सुरक्षा देण्यात आली आहे.
कुंभमेळयामध्ये सर्व ठिकाणी श्वानपथकासह सर्व ठिकाणी तपासणी केली गेली. तसेच एटीएस व एनएसजी पथकांकडून सर्वत्र पाहणी करण्यात आली आहे. तसेच संगम क्षेत्रावर पॅरा मिलिट्री फोर्स देखील दाखल झाले आहे. गंगा स्नानानंतर पंतप्रधान मोदी हे इतर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.