आधीच दिवसाआड पाणी, त्यात आणखी कपात! पिंपरी-चिंचवडकरांचं टेन्शन वाढलं, ऐन नवरात्रीत मोठा निर्णय…


पुणे : शारदीय नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरात विविध ठिकाणी उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यावरही होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 ऑक्टोबरपासून आणखी 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. सध्या शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नव्या कपातीमुळे नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात

पिंपरी-चिंचवड शहराला सध्या पवना धरणातून 540 एमएलडी, आंद्रा धरणातून 95 एमएलडी आणि एमआयडीसीकडून 30 एमएलडी, असा एकूण 665 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.

शहरात 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पावसाने सुरुवातीला ओढ दिल्याने जलसंपदा विभागाने पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात केली होती. ही कपात रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दुष्काळजन्य परिस्थिती कायम असल्याने पाणीकपात कायम ठेवण्यात आली.

आता परिस्थिती आणखी गंभीर झाल्याने जलसंपदा विभागाने पाणीपुरवठ्यात अतिरिक्त 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहराला आधीच 105 एमएलडी पाण्याची तूट भासत असताना आता नव्या कपातीमुळे नागरिकांसमोरील पाणी संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना टँकरचा आधार

पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे 770 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सध्या केवळ 665 एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने दररोज 105 एमएलडी पाण्याची कमतरता भासत आहे.

याचा फटका वाकड परिसरातील सोसायट्यांनाही बसला आहे. 200 ते 500 फ्लॅट असलेल्या सुमारे 34 सोसायट्यांना महापालिकेकडून केवळ 50 टक्के पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे रहिवाशांना पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

सोसायट्यांना नियमित आणि पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

उपलब्ध पाण्यानुसार होणार वाटप

पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, सध्या शहराच्या मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत आहे. 16 ऑक्टोबरपासून धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यानुसार शहरात पाण्याचे वाटप केले जाणार आहे. यासंदर्भातील पत्र प्राप्त झाल्यानंतर पुढील पाणीवाटपाचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!