एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते? बड्या नेत्याच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते, असा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे. दलवाई यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही दलवाई यांच्या दाव्याला दुजोरा देत शिंदे काँग्रेसमध्ये जाण्यासाठी दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधला होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या दाव्यानंतर आता एकनाथ शिंदे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा केला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध केल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं होतं. याबाबत हुसेन दलवाई यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मुंडे काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्याबाबतही त्यांनी मोठा दावा केला.


दलवाई यांच्या मते, एकनाथ शिंदे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अहमद पटेल यांच्यासोबत चर्चाही झाली होती. मात्र, काँग्रेसमधील काही नेत्यांनी विरोध केल्यामुळे हा प्रवेश होऊ शकला नाही. त्यानंतर संजय राऊत यांनीही या दाव्यावर प्रतिक्रिया दिली.
शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत राऊतांचा दावा
संजय राऊत यांनी दावा केला की, काँग्रेस सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी विविध पातळ्यांवर चाचपणी केली होती. अहमद पटेल यांच्या माध्यमातून दिल्लीत बैठका आणि भेटीगाठी होत असल्याची माहिती आमच्याही कानावर आली होती, असं राऊत म्हणाले.
शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी व्हायचं होतं. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातील नेते असल्याने त्यांना याबाबत अधिक माहिती असण्याची शक्यता असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. त्यावेळी शिंदे रात्रीच्या वेळी दिल्लीचा प्रवास करत होते आणि ते कोणाच्या माध्यमातून ये-जा करत होते, याचीही माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेना पक्षाच्या सुनावणीवरही भाष्य
शिवसेना पक्षासंदर्भातील न्यायालयीन सुनावणीवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आमचा युक्तिवाद पूर्ण होईल. त्यानंतर विरोधी गटाला युक्तिवादासाठी काही दिवसांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर प्रकरण निर्णयासाठी राखून ठेवले जाईल आणि दीड महिन्याच्या कालावधीत निर्णय येण्याची शक्यता असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
हा खटला महत्त्वाचा असून, त्यातून एक महत्त्वपूर्ण निकाल समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.
नाशिकच्या घटनेवरून फडणवीसांवर निशाणा
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली. नाशिकमधील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या 12 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि जखमींना 50 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यात मखमलाबाद आणि त्र्यंबक रोड परिसराची पाहणी करावी, ताफा न नेता प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी, अशी मागणी राऊत यांनी केली. नाशिकमधील दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संबंधित महापालिका आयुक्तांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.