पुण्याच्या दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा दावा; लाड कुटुंबाचा भाजपप्रवेश ते गोकुळच्या जागावाटपावर महाडिक स्पष्टच बोलले

कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या दोन्ही जागा भाजप लढवणार असल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे. पुणे पदवीधरची जागा मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी जिंकली होती. मात्र, लाड यांचे संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये आल्याने या जागेवर भाजपचा दावा असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. शिक्षक मतदारसंघात मागील वेळी काँग्रेस विजयी झाली होती; तरी यावेळी दोन्ही जागा भाजप म्हणून लढवण्याचा वरिष्ठांचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्याचे महाडिक म्हणाले. जागावाटपासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षांच्या ठरावांची संख्या तसेच संबंधित संस्थांची माहिती तपासून जागा निश्चित करण्याबाबत चर्चा झाली आहे. भाजपने आठ, राष्ट्रवादीने दहा, शिवसेनेने आठ, तर जनसुराज्यने तीन जागांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

या जागावाटपासाठी महायुतीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडल्यानंतर दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊन कळवतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती महाडिक यांनी दिली. मुख्यमंत्री चारही पक्षांचे प्रमुख असल्याने ते जो निर्णय देतील, तो सर्वांना मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


महाडिक यांनी गोकुळच्या निवडणुकीच्या राजकीय पार्श्वभूमीवरही भाष्य केले. यापूर्वी जवळपास २५ वर्षे महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता असताना निवडणुका पक्षीय पातळीवर न होता गटांच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना नेत्यांना मुंबईत बोलावून महाविकास आघाडीचे पॅनेल तयार करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तासमीकरणानुसार गोकुळमध्ये महायुतीचे पॅनेल करून निवडणूक लढवण्याचा निर्णय असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे महायुतीतील जागावाटप आणि उमेदवार निश्चितीला आता वेग येण्याची शक्यता आहे.
गोकुळ निवडणुकीतही माघारीची अंतिम मुदत ८ ऑक्टोबर असल्याने त्याआधी महायुतीतील जागावाटपाचा निर्णय होणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुणे विधान परिषद निवडणुकीतील भाजपचा दावा आणि गोकुळमधील जागावाटप या दोन्ही मुद्द्यांमुळे कोल्हापूरसह महायुतीच्या राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत.
