विखे की थोरात? जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत अखेर बाजी कुणाची? सुजय विखेंच्या नावावर शिक्कामोर्तब; थोरातांच्या जावयांनाही महत्त्वाची जबाबदारी!


अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताकेंद्रात कोणाची वर्णी लागणार, याकडे गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असताना अखेर या राजकीय सस्पेन्सवर पडदा पडला आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची बँकेच्या अध्यक्षपदी, तर रणजितसिंह देशमुख यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. या निकालामुळे जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

या निवडीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे, विखे आणि थोरात या जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी गटांशी संबंधित नेत्यांकडे बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. रणजितसिंह देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी विखे आणि उपाध्यक्षपदी देशमुख अशी झालेली निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात गटाशी संबंधित सहकार विकास पॅनलने २१ पैकी तब्बल १८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे बँकेवरील या पॅनलचे वर्चस्व कायम राहणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र, अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत संभ्रम होता. इच्छुकांची नावे, नेत्यांच्या भेटीगाठी आणि वरिष्ठ पातळीवरील चर्चांमुळे निवडीचा निर्णय लांबणीवर पडल्याची चर्चा होती.

या संपूर्ण घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अध्यक्षपदासाठी त्यांच्या पसंतीचा विचार केला जाईल, असे संकेत यापूर्वी डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले होते. अखेर त्यांच्या नावावर अंतिम सहमती झाल्याने अध्यक्षपदाचा तिढा सुटला. उपाध्यक्षपदासाठी रणजितसिंह देशमुख यांचीही एकमताने निवड झाली.

निकाल जाहीर होताच राहाता शहरात विखे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या जल्लोषातून समर्थकांनी नव्या नेतृत्वाचे स्वागत केले.

आता जिल्हा बँकेची सूत्रे सुजय विखे पाटील आणि रणजितसिंह देशमुख यांच्या हाती आली आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध करून देणे, थकित कर्जांचे प्रश्न हाताळणे, बँकेची आर्थिक घडी मजबूत करणे आणि सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देणे, अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर असतील. जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेल्या या बँकेचा कारभार नवे नेतृत्व कशा पद्धतीने चालवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!