‘उरुळीकांचन’ ला बिबट्याचा शिरकाव! भरलोकवस्ती जवळील शेळी फस्त केल्याने बिबट्याने भिती वाढवली..!!
उरुळी कांचन : उरुळी कांचन शहराच्या रहिवासी हद्दीतील गिरमे वस्ती परिसरात एका शेळीवर बिबट्याने झडप टाकून शेळी फस्त केल्याची घटना बुधवारी (दि. २२) दुपारी तीन वाजता घडली आहे.या
संपूर्ण प्रकाराने नागरीकांच्यात मोठी घबराट पसरली असून बिबट्या थेट लाखोंची लोकसंख्या असलेल्या उरुळीकांचन शहरात घुसल्याने नागरीकांत भितीप सरली आहे.
उरुळी कांचन शहराच्या ग्रामपंचायत हद्दीतील गिरमेवस्ती व पाटील वस्तीवर बिबट्याचे ठसे उमटल्याचा दुजोरा वनविभागाने दिला आहे. त्यामुळे भरलोकवस्तीत बिबट्या पोहचल्याने तातडीने त्याला जेरबंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेली दोन महिने बिबट्याने शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मचाले वस्ती परिसरात तळ ठोकला होता. भटकी २ ते ३ कुत्री व मेंढ्या या प्राण्याने ठार केल्या होत्या. आता मात्र लाखोंच्या लोकवस्तीत हा बिबट्या अवतारल्याने कमालीची घबराट पसरली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गिरमेवस्ती व पाटील वस्ती येथे बिबट्याचे दर्शन झाल्याचे स्थानिक नागरीक सांगत आहे. अशातच बिबट्याने गिरमेवस्तीवर शेळीच फस्त केल्याने हा प्राणी संहारक असल्याचे स्पष्ट झाले असल्याने वन विभागाने तातडीने बिबट्याला ताब्यात घेणे अनिवार्य
बनले आहे.
उरुळीकांचन जवळील शिंदवणे गाव, डाळींब या गावात बिबट्याने दोन महिने तळ ठोकला आहे. मात्र वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आल्याने हा बिबट्या आता शहरी मानवी लोकवस्तीत शिरल्याने नागरीकांत भिती वाढली आहे.
“उरुळीकांचन परिसरात बिबट्याचे ठसे आढळले असून स्थानिक ठिकाणी नुकसानीचा पंचनामा झाला आहे. परिसरात वास्तव असलेला हा बिबट्या असण्याची शक्यता आहे. वन विभाग तातडीने रेस्क्यू टिम पाठविणार आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत”
– सुरेश वरक
(हवेली तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी)