Uruli Kanchan : पालखी सोहळा अडथळा प्रकरण भोवलं! उरुळीकांचनचा जगदगुरुंचा परतीचा मुक्काम विश्वस्तांकडून रद्द..!!
Uruli Kanchan उरुळीकांचन : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा नगारा बैलगाडा अडविण्यासहीत पालखी विश्वस्तांशी झालेल्या वादावादी करण्याचा प्रयत्न उरुळीकांचन (ता.हवेली ) येथील ग्रामस्थांच्या अंगलट आले असून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी उरुळीकांचन येथील पालखी परतीचा मुक्कामरद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयाने परतीच्या वाटेवरील पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ मुकले असून या परतीच्या वाटेचा मुक्काम कदमवाकवस्ती (ता.हवेली) पालखी स्थळावर पालखी सोहळा प्रमुखांनी निश्चित केला आहे. पंढरीच्या वाटेवर जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळा ३ जुलै रोजी उरुळीकांचन येथील दुपारच्या मुक्कामासाठी दाखल होत असताना, पालखीचा मार्ग बदल्याचा कारणावरून ग्रामस्थांनी पालखी रथापुढील चालणाऱ्या नगारा बैलगाडा रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता.
या दरम्यान पालखी सोहळा व सोहळा प्रमुख यांच्यात जोरदार वाद होऊन हा सोहळ्याचा दुपारचा मुक्काम हा रद्द करण्याची परिस्थिती उद्वभवून हा मुक्काम पुणे- सोलापूर महामार्गावरच करण्यात आला होता. त्यानंतर या सोहळ्याचा पालखी मार्गात बदल व ग्रामस्थांच्या भावना दुखावल्याचा कारणावरून ग्रामस्थांनी आक्रमकपणा घेतला होता.या सर्व प्रकारानंतर पालखी परतीच्या वाटेवर असताना शनिवारी (दि.२७) उरुळीकांचन गावात नियोजनाप्रमाणे मुक्कामी राहणार होता.
मात्र पालखी सोहळा प्रमुख विशाल मोरे महाराज यांनी हा मुक्काम रद्द केला असल्याचे पत्र काढल्याने ग्रामस्थांवर पारंपारीक पध्दतीने पालखी सोहळ्याचे आदरतिथ्य व सेवाभाव देण्यास मुकणार आहे. या पत्रकात सोहळा प्रमुख विशाल मोरे महाराज यांनी उरुळीकांचन चा मुक्काम रद्द करुन पुढील वर्षीची पालखीमार्गाची रुपरेषा पुढील वर्षी ठरविणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे त्यामुळे या प्रकाराने उरुळीकांचन ग्रामस्थ व्यथीत झाले आहेत.
ग्रामस्थांकडुन घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त!
उरुळीकांचनच्या पालखी विसाव्यातील घडलेल्या प्रकारानंतर उरुळीकांचन ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारानंतर उरुळीकांचन ग्रामस्थांनी संयमाची भूमिका घेऊन घडलेल्या या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच पालखी विश्वस्तांना या गावात पालखी सोहळ्याचा परतीचा मुक्काम घ्यावा म्हणून विनवण्या केल्या आहेत. मात्र पालखी विश्वस्तांनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार न करता परस्पर निर्णय जाहीर केल्याने मुक्काम होईल या आशेवर ग्रामस्थ आहेत.