Uruli Kanchan : बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला, कुत्र्यांमुळे वाचला मालकाचा जीव, वळती येथील घटना…

Uruli Kanchan : डोंगर परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्या – मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या वळती (ता. हवेली) येथील एका ४१ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच सदर व्यक्तीने समयसूचकता दाखवल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
ही घटना वळती ग्रामपंचायत हद्दीतील वरचा मळा परिसरात मंगळवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात शेतकरी व पशुपालक यांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बापू पांडुरंग कुंजीर (वय.४१ , रा. वळती, ता. हवेली) असे समयसूचकता दाखवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, बापू कुंजीर व त्यांच्या गावातील आणखी काही नागरिक दररोज वळती परिसरातील वरचा मळा परिसरात व डोंगर भागात जनावरे व शेळ्या चरण्यासाठी घेऊन जातात. मंगळवारी सायंकाळी घरी जाताना वाटेवर एका ठिकाणी एक बिबट्या दबा धरून बसला होता.
यावेळी बापू कुंजीर हे त्यांच्या शेळ्या या लांब गेल्याने घरी वळवून आणण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर तीन कुत्रेही बरोबर होते. यावेळी दबा धरून बसलेला बिबट्या त्यांना दिसून आला. Uruli Kanchan
यावेळी त्यांनी त्याच्याकडे पाहिले असता त्याने बापू कुंजीर यांच्या दिशेन धाव घेतली. यावेळी समयसूचकता दाखवत कुंजीर यांनी शेजारी असलेल्या काटवनात उडी घेतली. यावेळी त्यांच्या अंगाला जखमा झाल्या.
बिबट्याने ज्या वेळेस हल्ला करण्याच्या तयारीत असताना त्यांच्या बरोबर असलेल्या तीन कुत्र्यांनी जोरदार भुंकण्यास सुरुवात केली. तसेच बापू कुंजीर यांनी मोठ्याने ओरडल्याने त्या ठिकाणावरून बिबट्याने पळ काढला. त्यामुळे बिबट्या पळून गेल्याने बापू कुंजीर यांचा जीव वाचला आहे.
दरम्यान,वळती व परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असून पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहे. जनजागृती अन् इतर ठोस उपाययोजना करून देखील बिबट्याला काही फरक पडत नसल्याचे नागरिकांनी सांगीतले आहे.