‘युपीएससी’चा निकाल जाहीर!! पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा तर प्रयागराजची शक्ती देशात पहिली..

नवी दिल्ली : यूपीएससीने २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या परिक्षेत छत्रपती संभाजीनगर येथील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा रॅँक पटकावला असून पुण्याच्या अर्चित डोंगरे राज्यात पहिला आणि देशात तिसरा ठरला. प्रयागराजची शक्ती दुबे देशात टॉपर ठरली आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिने यश संपादन करत देशभरात ९९ वा क्रमांक मिळवला आहे. तेजस्वी हिने आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नाथ व्हॅली स्कूलमध्ये पूर्ण केलं.
नंतर ती दिल्लीला गेली आणि तिने लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच तिच्या मनात यूपीएससीची तयारी करण्याची ठाम इच्छा निर्माण झाली आणि तिने दिल्लीमध्येच राहून अभ्यास सुरू केला. आणि अखेर तिने मोठं यश मिळवलं आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत.
यूपीएससीने आयएएस, आयपीएससह सेवांमध्ये ११३२ पदांसाठी अर्ज मागवले होते. पूर्वी मूळ अधिसूचनेतही फक्त १०५६ रिक्त जागा होत्या पण नंतर त्या ११३२ पर्यंत वाढवण्यात आल्या. त्यानंतर निकालात एकूण १००९ उमेदवारांना यश मिळालं आहे. त्यापैकी ३३५ उमेदवार सामान्य श्रेणीतील आहेत. असेही सांगितले गेले आहे.
तसेच १०९ जण ईडब्ल्यूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी आणि ८७ एसटी प्रवर्गातील आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. १७ एप्रिल २०२५ पर्यंत युपीएससी परीक्षेच्या मुलाखती सुरु होत्या. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या २८४५ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे .