संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना भीक घालत…

बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि आमदार सुरेश धस यांनी केली होती. तर, मुख्यमंत्र्यांनी देखील फोनवरुन उज्ज्वल निकम यांच्याशी संवाद साधला होता.
अखेर, देशमुख कुटुंबीय गावकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलनास बसल्यानंतर निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर काही राजकीय टीकात्मक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. आता, निकम यांनी या नियुक्तीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सरपंच देशमुख हत्याप्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणात माझा सहभाग सुरू होईल. गावकरी देशमुख कुटुंब यांनी सतत माझ्या नावाची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती.

ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यानंतर रात्री मी मुख्यमंत्र्यांना कळवलं की, या प्रकरणात मी सरकारी वकील म्हणून काम करायला तयार आहे. याप्रकरणी, माझ्यावर करण्यात येणाऱ्या राजकीय टिकेची मला गंमत वाटते, एका निवडणुकीत मी लढलो आणि राजकीय परिपक्वता नसलेले लोक माझ्यावर टीका करत आहेत. गावकऱ्यांना मी आवाहन करतोय तुम्ही काळजी करू नका, मी आहे असेही उज्ज्वल निकम यांनी म्हंटले आहे.
न्यायासाठी मी लढणारा आहे, हे महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या जनतेला माहीत आहे. पोपटगिरी करणाऱ्या लोकांना पोपटगिरी करू द्या, त्यांना मी भीक घालत नाही. देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये. राजकीय लोकांच्या चिथावणीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहनही निकम यांनी देशमुख कुटुंबीयांना केले आहे.