महाकुंभमेळ्यात महिलांचे ‘ते’ व्हिडीओ बनवून डार्क वेबवर विकले, महाराष्ट्रातील दोघांना अटक, नेमकं केलं काय?

प्रयागराज : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडीओ चोरून डार्क वेबवर विकण्याच्या प्रकरणात गुजरात पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथून एका तरुणाला अटक केली आहे. यासोबतच लातूर जिल्ह्यातील प्रज्वल तेली आणि प्रयागराजमधील चंद्रप्रकाश फुलचंद यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करताना गुजरात पोलिसांना लातूर जिल्ह्यातील प्रणव तेली हा परदेशी हॅकर्सच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. हा तरुण रोमानिया आणि अटलांटा येथील हॅकर्सच्या मदतीने महिलांचे व्हिडीओ चोरी करून डार्क वेबवर पोस्ट करायचा.
याबाबत पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे की, आरोपींनी टेलिग्रामवर वेगवेगळी अकाउंट्स तयार करून, त्यांचे सदस्यत्व २ हजार ते ४ हजार रुपयांना विकले. या माध्यमातूनच ते महिलांचे व्हिडीओ विकून मोठी रक्कम कमवत होते. फक्त महाकुंभमेळ्यातीलच नव्हे, तर गुजरात आणि महाराष्ट्रातील मॉल्स आणि हॉस्पिटलमधील महिलांचे व्हिडीओ चोरी करून ते डार्क वेबवर टाकल्याचे समोर आले आहे.
याबाबत लातूरच्या आरोपीच्या खात्यात परदेशातून पैसे जमा झाल्याचा पुरावा गुजरात पोलिसांना मिळाला आहे. या प्रकरणात गुजरात आणि प्रयागराजमध्ये दोन गुन्हे दाखल झाले असून, एकूण १३ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे आणि या प्रकरणात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.