बीड हादरलं! दोन मैत्रिणींचा एकाच प्रियकरावरून वाद, वादाचा झाला भयंकर शेवट, महिला होमगार्डला…

बीड : बीड शहरातून हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडवरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

अयोध्या राहुल व्हरकटे (वय २६, रा. लुखामसला, ता. गेवराई) असे मृत महिलेचे नाव आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. तिला तीन वर्षांची मुलगी असून ती सध्या सासरी आहे. अयोध्या काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती आणि बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलिस भरतीची तयारी करत होती.
दरम्यान, अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे राठोड नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी राठोडची जवळीक अयोध्याशी वाढली. यामुळे फडताडे हिच्या मनात तीव्र राग निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्याला घरात बोलावून घेतले. तेथे आपल्या मुलाच्या मदतीने अयोध्याचा गळा दाबून तिचा खून केला.

दरम्यान, यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा डाव रचण्यात आला. मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून फडताडेच्या मुलाने आपल्या ओळखीच्या व्यक्तीची स्कूटी घेतली. त्यात मृतदेह ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकण्यात आला. गुरुवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला आणि घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी चौघांना ताब्यात घेतले.