शिक्रापूरमधील सणसवाडी येथे बांधकाम ठेकेदाराला खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक…!

शिक्रापूर : सणसवाडी येथील एका बांधकाम ठेकेदाराला गावामध्ये कोठे बांधकाम करायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागेल असे म्हणून ठेकेदाराचे अपहरण करुन मारहाण करत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर व रतन दत्तात्रय कामठे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे वेगवेगळ्या ठिकाणी बापूराव बहिर हे बांधकाचे ठेके घेऊन काम करतात त्यातून त्यांची ऋषिकेश दरेकर याच्याशी ओळख झालेली होती.
दरम्यान, बापूराव यांना (दि.22 मार्च) रोजी ऋषिकेश याने फोन करुन सणसवाडी चौकात बोलावून घेतले, काही वेळाने ऋषिकेश व रतन दोघांनी कार मधून सदर ठिकाणी येऊन बापूराव यांना आमच्या गावात काम करतो आम्हाला महिन्याला 20 हजार रुपये द्यावे लागेल असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांनतर बापूराव यांना कार मध्ये बसवून सराटे वस्ती येथे घेऊन जात त्यांचे हात बांधून शिवीगाळ, दमदाटी केली.
दरम्यान, बापूराव यांची त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी पैसे देण्याचे कबूल करत हात सोडून पळून जात शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले. घडलेल्या प्रकाराबाबत बापूराव आश्रुबा बहिर (वय ३८) रा. रामनगर पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे व रतन दत्तात्रय कामठे रा. धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहे.