तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद, भाविकांना मुखदर्शन, मंदिर समितीचा निर्णय…

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता पुढील दहा दिवस तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत हा निर्णय लागू असणार आहे.

या काळात भाविकांना देवीचं फक्त मुखदर्शन घेता येणार आहे. देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद करण्यात येणार आहे. कारण, पुरातत्व खात्याकडून येथे काम सुरू करण्यात आलं आहे. यामुळे यासाठी दहा दिवस लागणार आहेत.

काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात सुरु असलेल्या संवर्धनाच्या कामावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला होता. चुकीच्या पद्धतीने तुळजाभवानी मंदिराचे संवर्धनाचं काम होत असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटलं होतं. यानंतर काही बदल केल्याचे सांगितले जात आहे.

मंदिरातील भिंतीवर केलेले ब्लास्टिंग चुकीचे असल्याची माहिती देत यापूर्वी संभाजीराजेंनी कामावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर, आता पुरातत्व विभागाकडून पुन्हा काम सुरू करण्यात येत आहे. यासाठी हे मंदिर बंद असणार आहे. याठिकाणी अधिकृत बांधकांचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे.
दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे. यामुळे मुखदर्शनचालू असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
