तुकाराम मुंढेंच्या FDAचा ‘ऑनलाइन दणका’! अवघ्या २ महिन्यांत ७,००५ तक्रारींचा पाऊस; शिळ्या भातापासून घराशेजारच्या दारू दुकानापर्यंतच्या तक्रारी, २,८०९ प्रकरणांचा निकाल


मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज आणि बेधडक अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासनातील कडक कारवाईमुळे पुन्हा चर्चेत आहेत. नागरिकांच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर जलद कार्यवाही करता यावी, यासाठी FDAने सुरू केलेल्या ऑनलाइन तक्रार प्रणालीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पोर्टलवर गंभीर तक्रारींसोबतच काही भन्नाट आणि घरगुती स्वरूपाच्या तक्रारीही मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

दोन महिन्यांत ७,००५ तक्रारी

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांसाठी complaints.mahafda.in हे ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू केले आहे. अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षेशी संबंधित तक्रारी नागरिकांना आता घरबसल्या नोंदवता येतात. तक्रार दाखल केल्यानंतर तिच्यावर कोणती कार्यवाही झाली, याची सद्यस्थितीही ‘ट्रॅक स्टेटस’च्या माध्यमातून ऑनलाइन पाहता येते.

ही सुविधा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ७,००५ तक्रारी प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. त्यापैकी २,८०९ तक्रारींची चौकशी पूर्ण करून त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाच्या थेट यंत्रणेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.

शिळ्या भातापासून दारूच्या दुकानापर्यंत तक्रारी

ऑनलाइन पोर्टलवर आलेल्या तक्रारींचे स्वरूपही चर्चेचा विषय ठरत आहे. ‘बायकोने रात्रीचा शिळा भात सकाळी नाश्त्याला दिला’ अशा घरगुती स्वरूपाच्या तक्रारीपासून ते ‘घराच्या बाजूला दारूचे दुकान आहे’ अशा तक्रारीपर्यंत विविध प्रकारच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे FDAच्या कार्यक्षेत्राशी संबंधित तक्रारींची छाननी करताना प्रशासनासमोर वेगळे आव्हान उभे राहिले आहे.

पुण्यात सिप्लाच्या युनिटवरही मोठी कारवाई

दरम्यान, औषधांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर FDAने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील कॅरी अँड फॉरवर्डिंग (C&F) युनिटचा औषध विक्री परवाना रद्द करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील वाडकी येथील कंपनीच्या मुख्य वेअरहाऊसमध्ये करण्यात आलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली. रिएक्टिन प्लस टॅब्लेट्सच्या साठवणूक, पॅकेजिंग आणि बाजारातून औषध परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळल्याचे FDAकडून सांगण्यात आले आहे.

एकीकडे ऑनलाइन पोर्टलवर तक्रारींचा वाढता ओघ, तर दुसरीकडे औषधांच्या सुरक्षिततेबाबत थेट कठोर कारवाई, यामुळे तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखालील FDAची कार्यपद्धती पुन्हा चर्चेत आली आहे. नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मिळालेल्या ऑनलाइन सुविधेमुळे प्रशासनापर्यंत पोहोचणे सोपे झाले असले, तरी गंभीर तक्रारींसोबत येणाऱ्या अजब तक्रारींचेही प्रमाण लक्ष वेधून घेत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!