देशसेवा करताना काळाचा घाला! नाशिकच्या जवानाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; १५ दिवसांपूर्वीची भेट ठरली अखेरची


नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्याच्या ४११ पॅरा युनिटमध्ये कार्यरत असलेले पॅरा कमांडो शाकिब पिरामद पठाण (वय ३२) यांचे आग्रा येथे कर्तव्य बजावत असताना अपघाती निधन झाले. सैन्याच्या निवास परिसरात काम सुरू असताना त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सिन्नर तालुका आणि सोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.

शाकिब पठाण हे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून पुन्हा देशसेवेसाठी कर्तव्यावर रुजू झाले होते. मात्र, सेवेत परतल्यानंतर काही दिवसांतच नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

शाकिब यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण सोनांबे येथील जनता विद्यालयात, तर बारावीपर्यंतचे शिक्षण सिन्नर महाविद्यालयात झाले. लहानपणापासून भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी गावातील पर्सनल करिअर अकॅडमीमध्ये कठोर प्रशिक्षण घेतले आणि अथक मेहनतीच्या जोरावर भारतीय लष्करात प्रवेश मिळवला.

दरम्यान, शासकीय आणि लष्करी सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव विशेष विमान आणि त्यानंतर विशेष वाहनातून सोनांबे येथे आणण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यांच्यावर मुस्लिम रितीरिवाजांसह शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शाकिब पठाण यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा साजन आणि दोन भाऊ असा परिवार आहे. देशसेवा करत असताना एका शूर जवानाचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण परिसराला चटका लावणारा ठरला असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!