मुंबई-पुण्यातून महिलांना बोलवून कोल्हापुरात चालायचा ‘सौदा’; लॉजवरील भयावह रॅकेटचा पर्दाफाश, एकीची सुटका

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. करवीर तालुक्यातील वाशी येथील एका नामांकित लॉजवर पोलिसांनी धडक छापा टाकून मोठ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून, या रॅकेटमध्ये सामील असलेल्या दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणात लॉज मालकासह तीन जण फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाशी येथील ‘सनराईज लॉज’मध्ये हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून महिलांना पैशांचे आमिष दाखवून लॉजवर बोलवत होते. त्यानंतर या महिलांचे फोटो काढून ते व्हॉट्सॲपद्वारे ग्राहकांना पाठवले जात असल्याचा संशय आहे. ग्राहकांकडून मोठी रक्कम घेऊन हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

याच गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ‘सनराईज लॉजिंग’वर कारवाई केली. या छाप्यात दोन मुख्य दलालांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर प्रभाकर कांबळे (वय २८, रा. मिणचे बुद्रुक, ता. भुदरगड) आणि कमलेश कृष्णा पाटील (वय ३०, रा. हेळेवाडी, ता. राधानगरी) यांचा समावेश आहे.
दरम्यान, छाप्यानंतर लॉज मालकासह तीन संशयित आरोपी फरार झाले आहेत. शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील (लॉज मालक), सुहास निचिते आणि विक्रम दिनकर कांबळे अशी फरार आरोपींची नावे आहेत.
या हायप्रोफाईल रॅकेटचे जाळे आणखी कुठे पसरले आहे, तसेच यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.