मोठी बातमी! पुणे- दौंड डेमोच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, धक्कादायक माहिती आली समोर…

पुणे : मांजरी हद्दीतील गोपाळपट्टी परिसरात रेल्वेने दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात रविवारी (ता. १६) रात्री साडेआठच्या सुमारास झाला आहे. या अपघातात दोघेजण थोडक्यात बचावले आहेत.

प्रथमेश नितीन तिंडे (वय.१८ , रा. काळेपडळ, हडपसर), तन्मय महेंद्र तुपे (वय.१८ ,रा. विशाल कॉलनी, ढेरे बंगला, गोपाळपट्टी) व तुषार शिंदे (वय.१९, रा. गोपाळपट्टी, हडपसर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, पुणे- दौंड डेमू रात्री साडेआठच्या सुमारास पुण्याहून दौंडच्या दिशेने निघाली होती. यावेळी मयत तिघे व त्यांचे आणखी दोघे मित्र हे असे पाचजन रेल्वे रुळावर एकत्र आले होते. त्यावेळी दौंडच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या रेल्वेने त्यातील तिघांना धडक दिली.

इतर दोघेजण अपघात झाल्यानंतर घाबरून निघून गेले होते. या अपघाताची माहिती मिळताच हडपसर आणि लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत.याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा अपघात कसा झाला? याची माहिती अद्याप मिळू शकली नसून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.