तुळापुर परिसरात दुचाकीवर आलेल्या तिघांनी टेम्पोचालकावर कोयत्याने वार करून साडेपाच लाखांची रोख रक्कम लुटली; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी टेम्पोचालकास थांबायला भाग पाडून त्याच्यावर कोयत्याने वार करून ५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (ता. ०३) सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रियाज चांदभाई मुलाणी (वय ४१, रा. वाडेबोल्हाई, वाडेगाव) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, चाकण येथे दर शनिवारी (ता.०३) आठवडे बाजारासाठी रियाज मुलानी व त्यांचा साथीदार राजेंद्र जाधव हे टेम्पोमधून जात होते. इंद्रायणी पुलाजवळ दुचाकीवरुन आलेल्या तिघांना टेम्पोला दुचाकी आडवी लावून थांबायला भाग पाडले.
फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्या खिशातील ५ लाख ५० हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते पळून गेले.
तसेच हल्लेखोरांना फिर्यादी यांच्याकडे इतके पैसे आहेत, याची माहिती होती. त्यातूनचत्यांनी पाठलाग करुन त्यांना लुटल्याचा पोलिसांचा संशय आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोडसे करीत आहेत.