व्हाट्सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या वादातून अवैध धंदेचालकाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण ; एक जखमी तर तिघांवर गुन्हा दाखल


लोणी काळभोर : मोबाईलच्या व्हाट्सॲपवर स्टेटस विरोधात ठेवल्याचा राग मनात धरून अवैध धंदे करणा-याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने महिलेसह तिघांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे. सदर घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील सिद्राम मळा परिसरात असलेल्या म्हस्कोबा मंदिर समोरील रस्त्यावर शुक्रवार (५ सप्टेंबर) रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत एक जण जखमी झाला असून याप्रकरणी तीन जणांच्या विरोधांत पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत आकाश बाळू बागडे (वय २०), कल्पना बाळू बागडे व योगेश नागनाथ कांबळे यांना मारहाण झाली असून यातील फिर्यादी आकाश याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शंकर तानाजी धायगुडे (वय २८), नागेश चंद्रकांत वाघमारे (वय २८) व अक्षय गहिनीनाथ मस्तुद (वय २९, तिघेही रा. सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारांस आकाश व त्याचा मित्र योगेश कांबळे हे म्हस्कोबा मंदिर समोरील रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी तेथे शंकर धायगुडे आला. त्याने आकाशला बोलावले व मोबाईलमध्ये ठेवलेल्या स्टेटसचा राग मनात धरुन त्यांचे समवेत वाद घालण्यास सुरवात केली.वाद सुरू असताना शंकर सोबत असलेला त्याचा साथीदार अक्षय मस्तुद यांने तेथे पडलेले लाकडी दांडके उचलुन ते आकाश याच्या डोक्यात मारले. त्यानंतर घायगुडे व वाघमारे यांनी आकाश व त्यांचा मित्र योगेश कांबळे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी यांची आई कल्पना या भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती करू लागल्या. तेव्हा नागेश वाघमारे याने त्यांनादेखील हाताने मारहाण केली.

या मारहाणीत आकाश बागडे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.

शंकर धायगुडे हा अवैध धंदेचालक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यावर यापुर्वीही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करणे, दंगल घडवून आणण्याच्या प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे अशी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. धायगुडे याने आताही महिलेसह तिघांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. त्यामुळे या अवैध धंदेचालकाची मुजोरी कधी थांबणार? अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरदार रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!