कारमधून साडेतीन कोटींची रोकड जप्त ; गुन्हे शाखेसह लोणी काळभोर वाहतूक पोलिस आणि हडपसर पोलिसांची संयुक्त कामगिरी..!

पुणे : हडपसर परिसरात एका कारमधून पुणे पोलिसांनी सुमारे साडेतीन कोटींची रोकड जप्त केली आहे. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे आले कुठून याचा तपास सुरू आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचसह लोणी काळभोर वाहतूक पोलिस आणि हडपसर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

प्रशांत धनपाल गांधी (वय ४७, रा. लासूरणे, ता. इंदापूर, जि. पुणे) याना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, एका कारमधून मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री दहा वाजता वाहतूक शाखा, लोणी काळभोर पोलिस ठाणे, हडपसर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाच यांनी संशयित कार (क्रमांक एमएच १३ सीके २१११) ताब्यात घेतली.

तसेच संबंधित व्यक्तीला हडपसर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या कारमधील बॅगा तपासल्या. त्यावेळी बॅगांमध्ये तीन कोटी ४२ लाख ६६ हजारांची रोकड आढळून आली. ही रक्कम जप्त करून सीलबंद करण्यात आली आहे. यामुळे आता पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान याप्रकरणी प्राप्तिकर विभागाला पुढील कारवाई करण्याबाबत कळविण्यात आल्याची माहिती आहे. प्रशांत गांधी यांनी ही रक्कम घरातून पुण्यातील लक्ष्मी रोड येथील महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत कर्जापोटी भरण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे.