वसंत मोरेंच्या मुलाला धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात…!
पुणे : मनसेचे पुण्यातील फायरब्रॅन्ड नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले आहे. रुपेश मोरे याचे बनावट मॅरेज सर्टिफिकेट तयार करून त्याआधारे 30 लाख रुपये दे, अन्यथा गोळ्या घालू अशी धमकी देण्यात आली होती.
दरम्यान ,अल्फिया शेख या महिलेच्या नावे रुपेश मोरे यांना व्हॉट्सॲपवर धमकीचे मेसेज आले होते. रुपेश याचा अल्फिया शेख या मुलीसोबत विवाह झाला आहे, असे ग्रामसेवक, ग्रामपंचायत वडगाव, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद येथील बनावट मॅरेज सर्टिफिकेट तयार करण्यात आले आहे. ते मोरे यांना व्हॉट्सॲपवर पाठवून ‘हमने आपके नाम का मॅरेज सर्टिफिकेट बनाया है, खराडी आयटी पार्क के सामने गाडी मे बीस लाख रुपये रख देना, नहीं तो आपके उपर रेप के केस कर देंगे’, अशी धमकी देण्यात आली होती.
त्याचदरम्यान ,पुन्हा त्याच नंबरवरुन एक मेसेज आला. त्यामध्ये ‘मै अल्फिया शेख, 30 लाख रुपये नहीं दिये तो रेप केस मे अंदर कर दुंगी’, असा मेसेज पाठवण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी ‘दे रहा है क्या पैसा, नहीं तो मार दूंगा. तेरी पुरी सेटिंग हुई है, बहुत जल्द तेरे को गोली मारेंगे, तेरे बाप को बोल देंगे तेरे को बचाने के लिए’ असा आणखी एक धमकीचा मेसेज आला. या धमकीमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. वसंत मोरे यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासाची सूत्रे हालवत मुंबईतून एकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काहीजण असल्याचा पोलिसांना संशय आहे.