यंदा पाऊस काय थांबायचं नाव घेईना! राज्यावर पुन्हा संकट, 4 नोव्हेंबरपासून ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट…


पुणे : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जोरदार पुनरागमन करत शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. अनेक ठिकाणी कापणी सुरू असलेली आणि गोळा केलेली पिके या अवकाळी पावसामुळे भिजली आहेत. त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालं आहे.

सततच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, माती वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांसाठी मोठा पावसाचा आणि चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.

तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारनंतर आता महाराष्ट्रावर या नव्या हवामान बदलाचा परिणाम दिसणार असल्याचे संकेत आहेत. नुकत्याच झालेल्या मोंथा चक्रीवादळाने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पाडला होता. त्याचे परिणाम अजूनही टिकून असताना, आता नवीन चक्रीवादळाचा धोका हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरावर पुन्हा एकदा चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबरपासून हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. उत्तर अंदमान समुद्रात ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज वर्तवला गेला आहे.

या वाऱ्यांमुळे समुद्राची परिस्थिती खवळलेली राहील आणि अंदमान-निकोबार बेटांसह पूर्व किनारपट्टीवर परिणाम दिसून येईल. भारतीय हवामान विभागाने मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

तसेच किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही दिसू शकतो, असा हवामान खात्याचा इशारा आहे.

चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. पुढील २४ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार असून, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, आहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!