राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘हे’ गीत गावे लागणार!! शिक्षण विभागाकडून आला महत्वाचा आदेश…

पुणे : राज्याचा देदिप्यमान इतिहास विद्यार्थ्यांना कळावा, यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी राज्यातील शाळांमध्ये राज्यगीत वाजवण्याची सक्ती केली होती. तसेच आता राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सक्तीने वाजवले जाईल, असा स्पष्ट आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.
तसेच या निर्णयामागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत अभिमान जागवणे आणि एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. राज्य सरकारने या गीताच्या अनिवार्यतेसंदर्भात आधीही सूचना दिल्या होत्या, मात्र आता त्याची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांतही राज्यगीत सक्तीचे करत, या निर्णयाची व्याप्ती वाढवली. शालेय शिक्षण विभागाने नव्याने पत्रक काढत सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये राज्यगीत वाजलेच पाहिजे, असे निर्देश दिले आहेत. त्याबाबत विभागीय उपसंचालकांना करडी नजर ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या गीताची ओळख अधिक सखोल आहे. ‘काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी…’ अशा ओळींमधून राज्यातील नागरिकांची निर्भीड वृत्ती आणि अभिमान व्यक्त केला जातो. हे गीत प्रसिद्ध गीतकार राजा बढे यांनी लिहिलं असून, श्रीनिवास खळे यांचे संगीत आणि शाहीर साबळेंचा आवाज यामुळे ते आजही लोकांच्या मनात घर करून आहे.
दरम्यान, शालेय वेळापत्रकानुसार, दररोज सत्र सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत, परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा यांसोबत राज्यगीतही गायले जाणे बंधनकारक आहे. यापूर्वी सर्व शाळांना या संदर्भात वेळोवेळी सूचित करण्यात आले होते, मात्र अनेक शाळांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे शिक्षण विभागाच्या निरीक्षणात आले आहे. त्यामुळे आता जिल्हानिहाय अहवाल मागवण्यात येणार आहे.