विखे-पाटील नाही हे तर विकले गेलेले पाटील, सत्तेसाठी इतकी चाटूगिरी करू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जहरी टीका…

पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आमरण उपोषण केले. सरकारच्या आश्वासनानंतर बच्चू कडू यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू यांचे उपोषण हे प्रसिद्धीसाठी आहे. बच्चू कडूंना विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे शल्य आहे, अशी टीका केली होती.

आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला प्रहारचे प्रवक्ते ॲड मनोज टेकाडे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, हे विखे पाटील नाही तर हे विकले गेलेले पाटील आहेत. शेतकरी जो पोशिंदा आहे, त्याच्याबद्दल हे असे बोलतात. अहो, उपोषण करणं सोपं आहे तर तुमच्या मुलाला सात दिवस उपोषणाला बसवा. ते पण निवडणुकीत पडले आहेत.
तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्याने उस पिकवला नाही तर तुमचा उसाचा कारखाना उभा राहिला असता का? तुमच्या आजोबांना किंवा वडिलांना विचारा, असेही ते म्हणाले.

तसेच ते म्हणाले, शेतकऱ्यांनी उसाचा कारखाना उभा करायला दागिने आणि पैसा दिला होता, त्यावर तुमचं आज वैभव उभं आहे. शेतकऱ्यांनी तुम्हाला उभं केलं आहे. त्या शेतकऱ्याबाबत तुम्ही असे बोलत आहात. उपोषण इतकंच सोपं आहे, तर मग आपल्या मुलाला उपोषणाला बसवा. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

दरम्यान, सहकारधुरीण हे पुस्तक तुम्ही वाचा. तुम्ही स्वतः सेना, काँग्रेस, भाजप, असे फिरत राहिले. इतकी चाटुगिरी माणसाने करू नये. किमान शेतकऱ्याच्या बाजूने तरी उभेत राहावे, असेही मनोज टेकाडे यांनी म्हटले आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.