पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरातून 24 लाखांचा ऐवज लंपास; वेगवेगळ्या भागांत चोरीच्या घटनांनी खळबळ


पुणे : शहरातील विविध भागांत घरफोडी, लॅपटॉप चोरी आणि सोनसाखळी लंपास करण्याच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रस्ता, खराडी, हडपसर आणि रास्ता पेठ परिसरात घडलेल्या या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील मधुबन सोसायटीत राहणारे एक कुटुंब तुळजापूर आणि पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दोन दिवस घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटांमधील सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड असा तब्बल 24 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कुटुंबीय परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, खराडी आणि हडपसर परिसरातही चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. खराडीतील थिटे वस्ती भागात घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी रोकड, लॅपटॉप, मोबाईल आणि पाकीट असा सुमारे 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तर हडपसरमधील ससाणेनगर येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोन तरुणांचे दोन लॅपटॉप आणि पाकीट मिळून सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

याशिवाय, रास्ता पेठ ते मार्केट यार्डदरम्यान रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. रिक्षामध्ये इतर प्रवासीही असल्याने गर्दीचा फायदा घेत ही चोरी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे राहिले असून नागरिकांनी घर बंद ठेवताना तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!