गाडी बॉम्बनं उडवणार, घरात घुसून मारणार; सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…


मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, यामुळे पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानसंदर्भातला धमकीचा मेसेज आला.

तसेच, याच मेसेजमध्ये सलमान खानला घरात घुसून मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खान धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वाहतूक विभागाचा व्हॉट्सॲप नंबर सार्वजनिक असल्याने अशा धमक्या येण्याची शक्यता अधिक असते, तरी या धमकीने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. सलमान खानला याआधीही अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. एप्रिल २०२४ मध्ये ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला होता.

तसेच, सलमानच्या वडिलांनाही धमकीचं पत्र मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली असून, त्याने बुलेटप्रूफ गाडी आणि बुलेटप्रूफ बाल्कनीचीही व्यवस्था केली आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्येमागील बिष्णोई गँग कनेक्शन समोर आल्यानंतर तात्काळ सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली असून गेली कित्येक महिने सलमान खान कुठेही जाताना सुरक्षारक्षकांसोबतच मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दिसतो.

दरम्यान, सलमान खानच्या वांद्रे येथील घरालाही सुरक्षारक्षकांचा घेराव असल्याचं पाहायला मिळतो. तर, वांद्र्यातील गॅलेक्सीमधील घराच्या गॅलरीलाही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत. अशातच नेहमी कडेकोट सुरक्षेत फिरणाऱ्या सलमानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!