एकाच कॉलेजमध्ये ओळख झाली, घरात कोणी नसताना तो भेटायला यायचा; मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : नवी मुंबईतील रबाळे परिसरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना समोर आली आहे. लग्नाचे आश्वासन देऊन १७ वर्षीय मुलीचे शोषण केल्याचा आरोप २१ वर्षीय तरुणावर करण्यात आला आहे.

एका २१ वर्षाच्या तरुणानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. लग्नाचं आमिष दाखवत लैंगिक संबंध ठेवले. मात्र, शेवटी अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.
या प्रकरणी रबाळे पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी तरुण आणि पीडित मुलगी दोघंही रबाळे परिसरातच राहतात. दोघंही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. पुढं या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. या ओळखीच्या दरम्यान आरोपीनं पीडितेला लग्नाचं आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

लग्नाचं आमिष दाखवत त्यानं मुलीसोबत जवळीक साधली. यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीनं पीडितेवर तिच्या राहत्या घरात दोनवेळा लैंगिक अत्याचार केला असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी १० आठवड्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे.
