शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल, ‘हा’ शेरा तातडीने हटवला जाणार..

पुणे : शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर हक्क स्पष्ट असणे हे त्यांच्या भविष्याचे संरक्षण करणारे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. अशातच आता शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवरील हक्क स्पष्ट करणाऱ्या प्रक्रियेला आता अधिक वेग मिळणार आहे.

महसूल विभागाने ‘जिवंत 7/12’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात 7/12 उताऱ्यातील ‘अ.पा.क.’ (अज्ञान पालक कर्ता) शेरा हटवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे हक्क अधिक स्पष्टपणे सिद्ध करता येणार आहेत.
दरम्यान, ही सुधारणा 18 वर्षे पूर्ण झालेल्या खातेदारांसाठी असून, त्यांच्यावरील पालक नोंदी (अ.पा.क. शेरा) हटवण्याची मोहीम राज्यभर हाती घेण्यात आली आहे. ही प्रक्रिया पारदर्शकतेसाठी आणि भावी कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

जेव्हा एखादी जमीन अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर असते, तेव्हा कायद्याने ती व्यक्ती अज्ञान (underage) मानली जाते. अशावेळी त्या खातेदारासाठी एखाद्या सज्ञान व्यक्तीला ‘अज्ञान पालक कर्ता’ म्हणून जोडले जाते आणि त्याचे नाव 7/12 उताऱ्यावर शेरा म्हणून नमूद केले जाते.
मात्र एकदा का त्या व्यक्तीने 18 वर्षे पूर्ण केली, की हा पालक शेरा हटवला जावा लागतो. अनेक प्रकरणांमध्ये वेळेवर ही नोंद न केल्यामुळे नंतर मालमत्ता वाद निर्माण होतात.
‘जिवंत 7/12’ मोहिमेअंतर्गत महसूल विभाग जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर काम करत आहे. खातेदाराच्या वयाचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला) तपासून ई-हक्क प्रणालीमार्फत अ.पा.क. शेरा हटवण्याची प्रक्रिया केली जाईल. या सेवेसाठी नागरिकांनी स्वतः तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे :
खातेदाराचा जन्मदाखला / शाळा सोडल्याचा दाखला. ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड इ.). संबंधित जमिनीची माहिती: जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर, खातेदाराचे नाव. मोबाईल क्रमांक व ईमेल ( असल्यास )
या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना जमिनीवरील पूर्ण मालकीचा हक्क स्पष्टपणे नोंदवता येणार आहे. भविष्यात जमिनीसंबंधी व्यवहार करताना किंवा वारसाहक्काचे प्रकरण समोर आल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही..